दहिवली बुद्रुक - चिपळूण
English Version    Marathi Version

पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली दहिवलीची समा यात्रा लवकरच सुरु होत आहे. अधिक महिना असेल त्यावर्षी ही समा यात्रा पौष पौर्णिमेस सुरु होते. या वर्षी गुरुवार २१ जानेवारी २०१६ ते शनिवार २३ जानेवारी २०१६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
संपूर्ण माहिती पत्रकासाठी.

पहिल्या दिवसापासून पालखीतील देवी देवतांच्या चांदीच्या मूर्ती, वरदान, मानाई , गुडाई, वाघजाई, भैरी , बाजी वस्त्रालांकाने सजविल्या जातात.
ढोल वाजंत्री सनई आणि घंटांच्या निनादात संपूर्ण गाव , मंदिर परिसरातील वातावरण, वरदान मानाईच्या नावानं चांग भलं घोषामुळे मंत्रमुग्ध करणारे असते.

उत्सवाचा प्रमुख भाग म्हणजे सर्वांनी मिळून ५० फूट मोठे, सरळ झाड तोडून ते सोलून लाट म्हणून गावागावातून नाचवत, महिलांच्या पंचारातींचा स्वीकार करत सर्व गावकऱ्यांच्या मदतीने गुलाल अबीराची उधळण करत, वाजत गाजत आणून मंदिरासमोरील २५ फूट उंचीच्या कायम स्वरूपी लाकडी खांबावर केवळ मनुष्य बळाने तोलून बगाडाच्या खोबणीत बसविले जाते. लाटेच्या दोन्ही टोकांना मजबूत दोरखंड बांधून पौर्णिमेच्या दिवशी मानकऱ्यानंतर भक्तगणांना दोरखंडावर चढवून खांबांभोवती गोलाकार फिरवले जाते. ढोल सनईची साथ दिली जाते.

ढोलकीची किव्वा दाफाची देवीला थाप देणे म्हणजे देवीचे इतर देवतांना केलेले आवाहानाचे साद असतात, हे आवाहन कवनाद्वारे केले जाते. या उत्सवामध्ये पहिल्या दिवसा पासून गुरव घराण्याला काम असते.
मानकऱ्याचे मानपान, पाहुण्यांची उठबस सांभाळत , विविध सांस्कृतिक , शैक्षणिक, संस्कारक्षम सामाजिक कार्यक्रम , देवीचा महाप्रसाद, अशा प्रकारे अनेक कार्यक्रम दिवसभरात दहिवली ग्रामस्थ प्रगती मंडळ नियोजनाअंतर्गत ३ दिवस चालू असतात. गावचे ग्रामस्थ आपली स्वतःची वैयक्तिक जबाबदारी समजून प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशेष लक्ष ठेवून असतात. त्रैवार्षिक सामा यात्रेनिमित्त मुंबई मंडळाच्या वतीने " स्मरणिका " प्रकाशित केली जाते.

॥ वरदान मानाईच्या नावाने चांग भलं ॥